पुण्यातल्या राहुल थिएटरची जन्मकथा..
बारामती तालुक्यात ढाकाळे म्हणून गाव आहे. हे गाव दुष्काळी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. नीरा कालवा आल्यानंतर ही मंडळी पणदरे, माळेगाव भागात रहायला आली. इथेच स्थायिक झाली. हा पट्टा धनगर वस्तीचा आहे.
चंदू शेठ जगताप हे धनगर होते. ते रोजंदारीवर कामाला होते. पुढे ठेका घ्यायला लागले. त्यातून मोठा व्यवसाय उभारला. पणद-यात त्यांनी भला मोठा वाडा बांधला. त्या काळातले या भागातले सर्वात श्रीमंत प्रस्थ म्हणून ते उदयास आले. दिवाळीला हत्तीवरून साखर वाटली जायची. वस्तीत फराळ वाटायचे.
त्यांचे सोबती कोकरे वगैरे सुद्धा आर्थिक दृष्ट्या संपन्न झाले. मात्र जगतापांइतके बलाढ्य कुणीच नव्हते. त्यांच्याशी सोयरीक करण्यासाठी वजनदार असामी धडपडत असत.
त्यांचे अनेक सांगीवांगीचे किस्से प्रसिद्ध आहेत.
पैसे तिजोरीत किंवा बॅंकेत न ठेवता पोत्यात भरून तळघरात पोतं फेकत असत. तळघरात अशी कित्येक पोती होती ज्याची मोजदाद सुद्धा केलेली नव्हती. ( त्या काळी नोटबंदी झाली असती तर ?)
त्यांचा नातू पुण्यात शिकायला होता. त्या वेळच्या हिंदविजय (नंतरचे नटराज) सिनेमाला दिलीपकुमारचा सिनेमा होता. हाऊसफुल्ल शो होता. याने बुकींग क्लर्कला त्या वेळची शंभराची नोट देऊ केली आणि तिकीट द्याच असे म्हणाला. बुकींग क्लर्क पक्का पुणेकर होता. तो म्हणाला " एव्हढा पैसा असेल तर बापाला जाऊन सांग थेटर बांधायला "
त्याने घरी येऊन सांगितले. आज्ज्याने ऐकले. आज्जा म्हणाला "माझ्या नातवाला दीडदमडीचा कारकुंड्या बोलला ? मी अस्सं थिएटर बांधीन की आख्ख्या पुण्यात तसं नसेल"
आज्जा तडक पुण्यात आला. त्या वेळी गणेशखिंड रस्त्याला एका जागेचा लिलाव चालू होता. आज्जाने पाहीलं. पाच हजार पर्यंत रक्कम वाढली होती. त्या वेळी पाच हजार ही खूपच मोठी रक्कम होती.
आज्जा म्हणजे चंदू शेठ जगताप आपले धनगराच्या वेषात होते. डोक्याला मुंडासं, कोपरी वर घोंगडी, धोतर आणि वहाणा.
हे आपले तिथे जाऊन म्हणाले "पाच लाख "
सगळेच स्तब्ध झाले. गणेशखिंड रस्त्याला पाच लाख बोली कुणी लावण्याच्या मानसिकतेत नव्हते आणि तेव्हढी आवश्यकताही नव्हती.
आयोजक म्हणाले "बाबा पाच लाख म्हणजे किती समजतंय का ? पैसे आहेत का एव्हढे तुमच्या जवळ ?"
आज्जाने पोलीस अधिका-याकडे गाडीची चावी दिली आणि म्हणाला " बाहेर माझी कार उभी आहे. तिच्यात डिकीत आणि मागच्या सीटवर पोती आहेत. घेऊन या. पाच लाख मोजा आणि बाकीचे पोलीसात वाटून टाका "
पोलिसांनी पोती आणली. पोत्यातून नोटा निघायला लागल्यावर सगळे हक्काबक्का झाले. पोत्यात नोटा भरल्याचे दुर्मिळ दृश्य पुणे शहर बघत होते. पाच लाख तर निघालेच. वरचे पन्नास हजार पोलीसात वाटून टाकले गेले.
आमचे चुलत आज्जे (आजोळचे) त्या बंदोबस्तात होते. त्यांनाही पैसे मिळाले. नेमकी रक्कम ठाऊक नाही आता.
त्या जागेवर आज्जाने सिनेमा हॉल बांधला.
त्याचे नाव राहुल.
पुढे नातवाने आपल्या आजोबांचा फोटो एण्ट्रन्स लावला होता. त्याच वेषात !
राहुल च्या उद्घाटनाला हिंदविजयच्या बुकींग क्लर्कला सन्मानाने बोलावले गेले.
त्याच्याच मुळे पुणे शहराला एक आलिशान आणि अत्याधुनिक सिनेमा हॉल मिळाला.
७० एमएम स्क्रीन आणि स्ट्रिरीफोनिक ध्वनीयंत्रणेसह सर्व अत्याधुनिक यंत्रणा असलेले हे थिएटर लवकरच पुणेकरांच्या गळ्यातले ताईत बनले.